Popular Posts

Saturday, 4 July 2015

ब्रेकिंग न्यूज!!

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ ब्रेकिंग न्यूज!! ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे. नेमके कोणते वाद्य वापरून ते संगीत निर्माण केलं असेल हे एक कोडं आहे. पण सातच्या बातम्या म्हणजे आमच्या दृक्श्राव्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे.
दिवसभरातल्या घडामोडी फक्त पंधरा मिनिटात सांगून होऊ शकतात यावर आजकालच्या पत्रकारांचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यांना तर आजकाल एक बातमी सांगायला अख्खा दिवसही पुरत नाही. एखादी गोष्ट सांगावी तशी बातमी रंगवून रंगवून सांगतात. आपले प्रदीप भिडे बातमी द्यायचे तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचे. अलीकडे वृत्तनिवेदक अभिनय केल्यासारखी बातमी देतात. बातमीचे गांभीर्य जेवढे कमी तेवढे यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य जास्त !
एखाद्या सकाळी आपण बातम्या बघायला म्हणून टीवी लावतो. न्यूज च्यानेल वर बातम्यांचा भडीमार सुरु असतो. म्हणजे असं की , स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक बातमी, खाली ब्रेकिंग न्यूजवर दुसरी बातमी, सगळ्यात खाली एकामागून एक वेगवेळ्या बातम्या , कुठेतरी कोपऱ्यात क्रिकेटचा स्कोर, एका बाजूला जाहिरात, आणि स्क्रीन च्या मधात तो निवेदक मोठमोठ्याने ओरडत असतो. तो नेमकी कोणती बातमी सांगतो आहे हे कळेपर्यन्त जाहिराती सुरु होतात. कंटाळून आपण दुसरं च्यानेल लावतो. तिथे फक्त वृत्तनिवेदक बदलला असतो. बाकी तेच !

११ सप्टेंबर च्या हल्ल्यानंतर भारतीय मिडीयाला "ब्रेकिंग न्यूज" हा शब्द सापडला. तेंव्हापासून देशात ब्रेकिंग न्यूज चा पूर येतोय.कुठे काही खुट्ट वाजलं की मिडीयाच्या दृष्टीने ती ब्रेकिंग न्यूज होते. आणि खुट्ट नाही वाजलं तर जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज होते. ("स्कोर्पियो ची कुत्र्याला धडक" हीसुद्धा ब्रेकिंग न्यूज होऊ शकते.त्यात जर स्कोर्पियो किंवा कुत्रा दोघांपैकी कोणीही एखाद्या सेलेब्रिटीच्या मालकीचं असेल तर विचारूच नका. कुत्र्याची जन्मकहाणी सांगण्यात येते. "कुत्ते का क्या कसूर" किंवा "विनाशक स्कोर्पियो" नावानी एखादी स्टोरी दाखवतात.) असं वाटतं दिवसभरात किती ब्रेकिंग न्यूज दिल्या यावर पत्रकारांचा पगार ठरत असाव.

नेत्यांच्या किंवा सेलेब्रिटीच्या घरासमोर हे टपूनच बसले असतात. बर्याच वेळ कोणी घराबाहेर नाही आलं तर इकडे लगेच ब्रेकिंग न्यूज :

शाहरुख घर से बाहर नही आये. क्या मिडीया से बचना चाहते हैं शाहरुख ?

तो घराबाहेर आला की त्याच्या तोंडाजवळ माईक नेउन इकडे दुसरी दुसरी ब्रेकिंग न्यूज :

शाहरुख घरसे बाहर निकले.

सकाळी सकाळी यांना बघून जर तो वैतागला तर तिसरी ब्रेकिंग न्यूज :

शाहरुख ने की मिडीया से बदसलुकी !!

काही च्यानेल्स वर तर बातमीचे एपिसोडस सुरु असतात. कदाचित एखाद्या नेता किंवा सेलेब्रिटी कडून हे बातम्यांचे कंत्राट सुद्धा घेत असतील. (हिरो–हिरोईनचं लग्न, तिची मंगळागौर(!), डोहाळजेवण, बाळाचं बारसं इ. सगळ्यांसाठी अमुक अमुक कोटी ! देव न करो पण घटस्फोट झालाच तर त्याचा वेगळा चार्ज लागेल ! ).

बातमी फिरवणं, अर्थाचा अनर्थ लावणं ह्यात तर मिडीयाचा हात कोणीच धरू शकणार नाही. (याविषयी एक काल्पनिक किस्सा नेहमी सांगितला जातो.

एक धर्मगुरू पहिल्यांदाच एक गावाला भेट द्यायला गेले. विमानतळावर त्यांचे आगमन होताचं पत्रकार त्यांच्या भोवती गोळा झाले. एकाने प्रश्न विचारला ,

"या गावातल्या वेश्यावस्तीला आपण सदिच्छा भेट देणार आहात का?".

यावर धर्मगुरुंनी प्रतिप्रश्न केला,

" या गावात वेश्या आहेत का?”.

लगेच टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज :

विमानतळावर उतरताक्षणी धर्मगुरूंचा पहिला प्रश्न !
या गावात वेश्या आहेत का ? !!!!

दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण मिडीयाने सगळ्यात जास्त उपयोगात आणली आहे. एखाद्या नेत्याच्या भाषणातलं किंवा मुलाखतीतलं वाक्य उचलायचं. आधीचे संदर्भ काढून भलत्याच संदर्भात ते वाक्य जनतेसमोर आणायचं. मग दुसर्या पक्ष्यातल्या नेत्यांची त्यावर प्रतिक्रिया घ्यायची. झालं भांडण सुरु !
यात आणखी एक प्रकार आहे. चार टाळकी गोळा करून कोणत्याही विषयावर चर्चा सुरु करायची. (त्यात चेतन भगत सारखे थोर विचारवंत सुद्धा येतात). चारही टाळकी विषय बाजूला ठेऊन एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढतात. एक वेळ अशी येते की कोण कोणाच्या प्रश्नाला उत्तर देतंय (का देतंय?) हेच कळत नाही. मग वृत्तनिवेदक रेफ्री असल्यासारखे त्यांच भांडण सोडवतात. तो अर्णव गोस्वामी तर देशाचा सरन्यायाधीश असल्यासारखा चर्चेचा निकाल जाहीर करून मोकळा होतो.

आजकाल मिडीयाने एक नवीन प्रकार सुरु केला आहे. एखाद्या घटनेची बातमी न देता त्या घटनेवरच्या वक्तव्यांची / प्रतिक्रियांची बातमी देतात. जिभेला हाड नसलेल्या नेत्यांनी भरलेल्या आपल्या देशात अश्या बातम्या मिळणं काही फार कठीण नाही. मग त्यावरून वाद सुरु होतात. मिडीयावाल्यांची दिवाळी सुरु !

रेड्यामुखी वेद वदता, मिडीयाची पेटली फ्युज !
ज्ञानियाची वाळीत झोपडी अनं रेड्याची ब्रेकिंग न्यूज !!

देशात किंवा एखाद्या राज्यात निवडणुका असल्या किंवा क्रिकेटचा सामना असला की ब्रेकिंग न्यूज सुरु. तिकडे खेळाडू प्रात:विधी आटपत असतात तेंव्हापासून यांचे क्यामेरे सज्ज असतात. सेहवाग की मां किंवा धोनी के पडौसी यांच्या मुलाखती चालू होतात. निखिल चोप्रा / साबा करीम सारखे क्रिकेट तज्ञ येतात. ते द्रविडच्या तंत्रातल्या चुका सांगतात, झहीर खान ला टिप्स देतात. अश्यात जर भारत सामना हारला तर काही खरं नाही. सगळ्या टीम ला कोर्टात उभं करून परस्पर शिक्षा सुनावून मोकळे होतात.
निवडणुकीच्या काळात उमेदवारांना सळो की पळो करून सोडतात. उत्साहाच्या भरात एखादा उमेदवार किलोभर आश्वासनं देतो. इकडे लगेच हे ती आश्वासनं पक्षाचा जाहीरनामा म्हणून दाखवतात. मतदार विचारत नसतील इतके प्रश्न हे त्या उमेदवाराला विचारतात. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेची घाई विजयी पक्षाएवढीच मिडीयाला झाली असते. शपथविधीनंतर चोवीस तासात ,सरकार दिलेली आश्वासनं कधी पूर्ण करणार यावर चर्चा सुरु होते. आणि आठ दिवसात सरकार निष्क्रिय असल्याची पावती दिली जाते.
देशात सगळ्यात जास्त अफवा मिडीया द्वारे पसरत असतील.

क्रिकेट वैगेरे ठीक आहे पण एखाद्या गंभीर घटनेचं मिडीयाकडून होणारं थिल्लरीकरण बघून वाईट वाटतं. रेल्वे अपघात, भूकंप, दंगल यासारख्या दुर्दैवी घटनांच्या चित्रफिती वारंवार दाखवल्या जातात. याविषयी एक नमूद करावसं वाटते. ११ सप्टेंबर च्या हल्ल्यात जवळजवळ ३००० लोकं मारले गेले. पण हल्ल्याची एक चित्रफीत सोडली तर दुसरी कोणतीही चित्रफीत किंवा फोटो अमेरिकन मिडीयाने दाखवले नाहीत.
आपल्याकडे मृतदेहांचे फोटो दाखवतात , मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतात,आपको कैसा लग रहा हैं वगैरे प्रश्न विचारतात !!

जनतेला बातम्या हव्या असतात. इथे त्यांना वादाचे विषय पुरवले जातात. आपल्याकडे मंगलकार्यानंतर देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे. आजकाल कोणत्याही घटनेनंतर मिडीयाचा गोंधळ घालण्याची पद्धत रूढ होते आहे. फरक एवढाच की देवीचा गोंधळ यजमानांच्या इच्छेने होतो. पण मिडीयाचा गोंधळ यजमानांवर लादला जातो !!
"गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता"
ह्या म्हणीत थोडासा बदल करून असे म्हणता येईल

गाढवांनीचं वाचली गीता
  जणू कालचा गोंधळ पुरे नव्हता ,
म्हणे कृष्ण सावळा गोंधळी ,
अरे आमचा काळ बरा होता !!


© चिनार जोशी ( chinarsjoshi.blogspot.com/2015/02/blog-post_25.html )

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment