Popular Posts

Saturday, 4 July 2015

अस्पृश्यांचा लष्करी पेशा - एक समीक्षा

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ अस्पृश्यांचा लष्करी पेशा - एक समीक्षा ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

पुस्तकाचे नाव : अस्पृश्यांचा लष्करी पेशा

लेखक : चांगदेव भ. खैरमोडे

प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.

पृष्ठसंख्या : १०९

प्रकाशन वर्ष : १९८७

मोफत डाउनलोड करा :

संकेतस्थळ -
१) https://msblc.maharashtra.gov.in/download.html ( पीडीएफ )

२) https://msblc.maharashtra.gov.in/download1.html ( पीडीएफ,ईपब, मोबी )


तसा चरित्र, इतिहास वगैरे या विषयांपासून मी थोडा दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. .. पण बाबासाहेबांचं चरित्र वाचण्यामागची दोन कारणे सांगतो, एक म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होउनच लिहिन्या विहिन्याचं धाडस आम्ही करू शकलो, बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत. .. दुसरं कारण म्हणजे आधी हा अंक ६ डिसेम्बर रोजी प्रकाशित होणार होता. .. ६ डिसेम्बर, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. .. त्यामुळे साहजिकच बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून अंकाची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं होतं. .. मग बाबासाहेबांच्या पूर्ण आयुष्यावर संशोधन सुरु केलं. .. याच दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर श्री. चांगदेव भ. खैरमोडे लिखित "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" चरित्राचे काही खंड मिळाले. .. या चरित्राच्या नवव्या खंडामध्ये “अस्पृश्यांचा लष्करी पेशा” असा मथळा देऊन महारांच्या लढाऊ परंपरेविषयी माहिती देणारे आठवे प्रकरण समाविष्ट केले होते. .. या प्रकरणात १९७० सालापर्यन्तच्या काळातील महार पलटणीच्या शौर्याची कहाणी त्यांनी सांगितली होती. ..
डिसेंबर, १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हे प्रकरण स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित केले. ..
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार किंवा चरित्र लेखक म्हणून श्री. चांगदेव भ. खैरमोडे उर्फ आबासाहेब खैरमोडे प्रसिद्ध आहेत. .. १९२३ ते १९६४ या काळात त्यांचे सामाजिक चळवळीवरील लेख व कविता अनेक नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. .. १९२९ साली त्यांचे ‘अमृतनाक’ हे खंडकाव्य प्रसिद्ध झाले. ..   बाबासाहेबांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते,’ 'हिंदु स्त्रियांची उन्नती व अवन्नती' यांचे अनुवाद त्यांनी केलेत. ..
अस्पृश्यां  चा लष्करी इतिहास आणि त्यांची लष्करातील गौरवशाली शौर्याची कामगिरी मुळातच उल्लेखनीय आहे. .. या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेल्या महार सैनिकांच्या तुकड्यांचा व १९४१ मध्ये उभ्या केलेल्या महार रेजिमेंट मधील महार सैनिकांच्या बहादुरीचा आणि कर्त्तव्यपरायणतेचा मानाने उल्लेख केला आहे. ..

"अस्पृश्यांचा लष्करी पेशा" या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आलेले काही संदर्भ बघू :

१) ". ..मुसलमानांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या, तेव्हां त्यांना शूद्रातिशूद्रांची दैंन्यावस्था दिसून आली. या लोकांना आपल्या छत्राखाली आणले तर ते आपल्या साम्राज्यासाठी लढू शकतील, हे त्यांनी हेरले. मुसलमानांनी आपल्या सैंन्यात शूद्रातिशूद्रांची भरती केली. या सैंनिकांनी मुसलमानी साम्राज्याची पाळेमुळे हिंदुस्थानच्या भूमीत रुजविण्यास मोठ्याप्रमाणांत मदत केली. .."

२) ". ..श्री. छत्रपति शिवाजी महाराज यांनी महारांना जंगलातील मार्ग, डोंगरकिल्ल्यावर जाणार गुप्त उघड मार्ग यांच्यावर देखरेख करणे आणि डोंगरी गडातील लोकांना जळण व वैरण पुरविणे, या कामावर नेमलेले होते. ही कामे म्हणजे लष्कराच्या संरक्षणाच्या नाड्या होत्या. त्या छत्रपति शिवाजी महाराजांनी महारांच्या हाती दिल्या होत्या. यावरून हे स्पष्ट होते की, महाराज महार जातीच्या इमानदारीची निःशंकपणे कदर करीत होते. याशिवाय गडमाचीवर महारांची वसती ठेवणे, हाही महाराजांनीच पायंडा पाडला. ही अवघड कामे करण्यासाठी महाराजांनी जसे महार कुटुंबाना वडिलोपार्जीत नोकरीवर ठेवले तसेच त्यांनी हजारो महार तरुणांना सैनिक म्हणून रणांगणावर शत्रूविरुद्ध लढविले. ..

३) ". ..पेशव्यांच्या सैंन्याला पळ काढावयास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व महार सैंनिकांची होती. त्यांनी आपल्या ४० पट संखेने असलेल्या पेशव्यांच्या सैंन्याला पळवून लावले. .."

वरील तीन संदर्भावरुन आपल्या लक्षात येईल की मुसलमान, शिवाजी महाराज, इंग्रज आणि अश्या वेगवेगळ्या सैन्यात त्यांना महत्वाची कामे दिल्या गेली होती. .. आणि प्रत्येक वेळी अस्पृश्यांनी आपल्या शौर्याने त्या त्या वेळी मोलाची कामगिरी करत अनेक पराक्रम गाजविले. ..
स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्या अनेक लहान मोठ्या लढाया झाल्या त्यातही महार पलटणींनी उल्लेखनीय कर्तबगारी दाखविली. .. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात महार रेजिमेंटचा सिंहाचा वाटा आहे. .. दुसऱ्या महायुद्धात पठाणी टोळ्यांच्या व इतरांच्या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे संरक्षणकार्य यांनी पार पाडले; तसेच इराकमध्ये अरब लुटारुंचा बीमोड केला, तर हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी सव्वालक्ष मुसलमानांना होऊ घातलेल्या पाकिस्तानकडे सुखरूप पोहोचविण्याचे कार्य त्यांनीच केले. क्वेट्टा शहरामध्ये मुसलमान दंगलखोरांना वठणीवर आणले व बलुचिस्तानातील हिंदु, शीख आणि इतर मुसलमानेतरांना भारतात यांनीच आणून सोडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७-४८ काळात पाकिस्तानने भारताविरुदध केलेल्या युद्धात जांगारे येथील भीषण लढाईत (२४ डिसेंबर १९४७) शेकडो पाकिस्तानी सैनिकांना व पठाणी घुसखोरांना कंठस्नान घालताना एक महार लढाऊ तुकडी गारद झाली. या तुकडीचे नेते हवालदार रावू कांबळे व नाईक बारकू कांबळे होते. नौशहर, उरी, चकोथी, टिटवाल, दरास, कार्गिल येथील लढायांत महार पलटणींनी लक्षणीय वीरकार्य केले; तर १९५३ मध्ये कोरिया युद्धसमाप्तीनंतर युद्धवंद्यांच्या अदलाबदलीचे अवघड व नाजूक कार्य पार पाडण्यात जनरल थोरातांना तिसऱ्या महार पलटणीचे साहाय्य मिळाले होते. गोवा मुक्तिसंग्रामामध्ये (१९६१) याच छत्रीधारी कंपनीने भाग घेतला होता; तर १९६२ साली चिनी आक्रमणाला (ऑक्टोबर- नोव्हेंबर) तोंड देण्यासाठी महार पलटणींनीच चुशूल, दौलतबेगोल्डी (लडाख व अक्साई चीन) आणि कार्मेग विभाग (ईशान्य भारत) या ठिकाणी शौर्य गाजविले होते. १९६५ च्या चिनी आक्रमणाच्या वेळीही कच्छ रणातील सरदारचौकी व व्हिगोकोट येथील लढायांत महार जवानांनी तलवार गाजविली. सप्टेंबर १९६५ मध्येही काश्मीरातील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर इ. लढायांत महार पलटनींनी शौर्य प्रकट केले होते. तसेच १९७१ सालच्या पाकिस्तानी आक्रमणातही महार पलटणी बांगलादेश, पंजाब व काश्मीर येथील युद्धांत होत्या; तर हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर आणि बांगला देशात शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट, बेलोनिया व चितगाग इ. ठिकाणच्या युद्धप्रसंगी त्यांच्या पराक्रमाची वाहवा झाली होती.

  लष्कराच्या नोकरीमुळे कित्येक महार व चांभार कुटुंबे सधन, सुशिक्षित व सुसंस्कृत झालेली होती.   .. म्हणूनच बाबासाहेबांनी सुद्धा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींनी रणांगणावर गाजवलेले शौर्य आणि निष्ठा लक्षात घेऊन इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांना लष्करात पुन्हा प्रवेश द्यावा व त्यांच्या पलटणी तयार कराव्यात याबद्दल चळवळी केल्यात. ..

महार किंवा त्यांच्यासारख्या जातिवर्णहीनांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती करण्याची परंपरा यूरोपीयांनी सुरू केली. .. ईस्ट इंडिया कंपनीने आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी अश्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना आपल्या गरजेनुसार लष्करात समाविष्ट केलं आणि नंतर महार पलटणीचे विसर्जनही केले होते. .. या सर्व पलटनणींचे तपशीलवार वर्णन खैरमोडे यांनी या पुस्तकात केले आहे. ..

१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव च्या स्तंभावर जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या महारांचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. .. त्याबद्दलचा एक संदर्भ बघुया. ..

"१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियन ची स्थापना करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला पहिल्या महार रेजिमेंट च्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोड्स्वार आणि ८ हजार पायदळी सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना नामोहरण करून आपल्या एकमेवाद्वितीय शौर्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ देतो आहे. तो विजय स्तंभ हा महारांच्या शौर्याचा प्रतिक आहे. आजही आंबेडकरी समाजाला तो विजय स्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्य इतिहासाची जाणीव देऊन देशभक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे."

महार जातीच्या लोकांनी रणांगणावर गाजविलेल्या शौर्याचे इतर काही ऐतिहासिक संदर्भ :

"१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा 'जीवा' महार इतिहासात प्रसिद्ध झाला."

" महार बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे.

१९८७ ला दक्षिण भारतात LITTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती. १३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या 'Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद्धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. "

अश्या या अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या पण रणांगणावर पराक्रम गाजविलेल्या महार जातीतील लोकं व महार बटालियन ची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडणारं हे पुस्तक. .. नक्की वाचा. ..


संदर्भ/मूळ स्त्रोत :

१) http://sandeepnandeshwar.blogspot.in/2012/12/blog-post.html

२) https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=10525

३) http://mr.wikipedia.org/wiki/महार_रेजिमेंट

४) अस्पृश्यांचा लष्करी पेशा, श्री चां. भ. खैरमोडे


© विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment