Popular Posts

Saturday, 4 July 2015

मनोगत

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ मनोगत ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

नमस्कार मित्रांनो,

सर्वप्रथम, आपणासर्वांकडून लाभलेल्या प्रेमाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार. ..

"मनापासून मनापर्यंत. ..!" चा तीसरा अंक प्रकाशित करण्यास विलंब झाल्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. .. खरं म्हणजे दिनांक ६ डिसेम्बर रोजीच तिसरा अंक प्रकाशित करायचं आम्ही ठरवलं होतं, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. .. ६ डिसेम्बर म्हणजे बाबासाहेबांचा परिनिर्वाण दिन. .. त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही तो अंक प्रकाशित करणार होतो. .. नंतर पुन्हा शून्यातून सुरुवात करुन १४ एप्रिल रोजी परत प्रयत्न केला. .. पण दुर्दैवाने तेही शक्य झालं नाही. ..

२६ जून ला त्रैमासिकाला एक वर्ष पूर्ण झालं. .. आणि त्यानिमित्याने आम्ही तीसरा अंक घेवून परत आलोय. .. २०१४ हे वर्ष आमच्या सदैव आठवणीत राहणारं वर्ष आहे. .. मनापासून मनापर्यंतच्या निमित्याने आलेले अनुभव सोनेरी आठवणींच्या रुपात आमच्या हृद्याच्या कोपऱयात नेहमी करताच कोरले गेले आहेत. .. खरं सांगायचं झालं तर मनापासून मनापर्यंत हे माझं स्वप्न होतं. .. विक्की, राहुल, सुनिल, हृषिकेश, वगैरे सगळ्यांनी ते स्वतःचं स्वप्न बनवलं. .. आणि सर्वांच्याच परिश्रमामधून हे स्वप्न साकार झालं. .. स्वप्न खरोखरच पूर्ण होतात हे या आधी कधी माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. .. मी या सर्वांचा हृणी आहे म्हंटलं तरी अतिशयोक्ति होणार नाही. ..

इंटरनेट वर एक त्रैमासिक वगैरे प्रकाशित करणे तसं कठीण वाटत नाही. .. आहेच काय त्यात? काय करायचं आहे?? दोन चार लोकांचं साहित्य गोळा करायचं, इंटरनेटवरुन एखाद्या विषयाबद्दल माहिती काढायची, मग इंटरनेटवरूनच छायाचित्रे वगैरे गोळा करून सगळी जुळवाजुळव केली की झालं. .. चूक. ..!! आम्हाला ही आधी असंच वाटलं होतं. .. पण प्रत्यक्षात मात्र हे एवढं पण सोपी नसतं. .. एक त्रैमासिक प्रकाशित करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. .. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे "टीम". .. एका उत्तम, यूनाइट आणि एक्टिव टीम शिवाय कुठलीही गोष्ट करने म्हणजे फक्त निरर्थक प्रयत्न आणि वेळेचा अपव्यय. .. माझी टीम सोबत नसती तर खरं म्हणजे ही त्रैमासिका कधी प्रत्यक्षात उतरली च नसती. .. म्हणूनच इंटरनेट वर नियमित मासिके प्रकाशित करणाऱ्या सर्वांसाठीच मनापासून हैट्स ऑफ. .. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे "वेळ". .. वाटतं तेवढया कमी वेळात कुठलीही गोष्ट होत नाही. .. इतक्या छोटयाश्या त्रैमासिकामागेही वेगवेगळ्या लोकांची कितीतरी दिवसांची मेहनत असते. .. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी पण वेळ येते की वाटतं नकोच हे सगळं, खूप झालं किंवा आता आपण हे करू शकणार नाही वगैरे आणि मग अश्या वेळी गरज असते ती सहनशक्तीची किंवा प्रेरणेची. .. जेव्हा आपण खचून जातो तेव्हा स्वतःशी लढने सगळ्यात कठीण असते. .. माझा आत्मविश्वास खचला तेव्हा वाटलं हा तीसरा अंक आता मी काढू शकणार नाही. .. तेव्हा सुनीलदाने खास आमच्यासाठी पाठविलेली कविता विक्कीने वाचून दाखविली. ..

"तू चालत रहा
  तू चालत रहा तू चालत रहा
  तू चालत रहा तू चालत रहा
  कधी सरळ सरळ कधी वक्र वक्र
 पायावर भंवरी चक्र चक्र
 कधी सुम सुसाट कधी बिन बोभाट
  कधि लपत छपत कधी गजबजाट
  तू चालत रहा…
  घाल खडावा, घाल रिबॉक,

पदयात्रा किंवा मॉर्निंग वॉक
  बन मिरवणूक, कर करमणूक,

चल धक्क्याने वा आपसूक

तू ठरव ध्येय, तू दिशा ठरव,
 तू जवळ लांबचा मार्ग ठरव
  चल नीघ अता, का उशीर मिता, घे किक स्टार्ट, सुट भन्नाट तू
तू चालत रहा …
  जग वाट पहातंय सुर्याची, तू नम्रपणे सुरुवात तो कर
  जो रोल मिळाला उचल गड्या, ये स्टेजवरी तू बनठनकर
  शिवधनुष्य प्रत्येकाच्या आयुष्याचे असते अलग अलग
  तू उचल तुझे, बन अग्नीबाण, प्रत्यंचा ओढून धडक धड्क
  तू स्वतःच बन मग ब्रह्मबाण,
 तोडून जीव, घेऊन आण
  तू चालत रहा
  तू चिल्लर खुर्दा बनू नको, चल महायज्ञ आरंभ तू कर
  तू विवेकानंद बन, किंवा गांधी, शिवाजी वा आंबेडकर
  जर व्यापारी, बन बिल गेटस, खेळामध्ये बन तेंडुलकर
  जर कवि लेखक बनणार गड्या, नोबेलखाली तडजोड न कर
  बघ पक्ष्याच्या डोळ्यामध्ये, तू लक्ष्य बनव,
 अन नेम धरून
  तू चालत रहा"
 
  या कवितेसोबतच सुनीलदाच्या प्रतिक्रियेत आणखी एक वाक्य होतं, ते म्हणजे
 "थांबू नका.". ..
 मग स्वतःशीच ठरवलं की आता काही ही झालं तरी थांबायचं नाही. ..
 तू चालत रहा. ..
 
कविता गोळा करने जितकं सोपी, कविता करने तितकंच कठीण. .. मुळात कविता करने वगैरे हा प्रकारच नसतो. .. कविता करता येत नाहीत. .. त्या होवून जातात. .. अगदी करणारऱ्याच्याही नकळत. .. आता हे च एक उदाहरण घ्या ना. ..

ऑगस्टचा एक दिवस होता. .. कित्येक दिवसांपासून तिच्यासोबत बोलणं झालं नव्हतं. .. मी पावसावरची एक प्रेमकविता वाचत होतो. .. तिला पावसात भिजयला फार आवडतं, मला अचानक आठवलं. .. मग अचानकच पावसाचा आवाज. .. खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. .. च्या मायला, खरोखरच पाऊस बरसत होता. .. धावतच खाली आलो. .. मनसोक्त भिजलो. .. कविता, आठवणी आणि पाऊस. .. मग अश्याच दोन ओळी सुचल्या. ..

"मी इथे भिजतोय,
  तू तिथे भिजत असशील न?
  सरींशी पावसाच्या माझ्याबद्दल
  बोलत तर नसशील न??"
 
  कविता कधी कधी दोन मिनटांत होतात. .. तर कधी कधी कित्येक दिवस प्रयत्न करूनही शब्द सुचत नाहित. .. कवितेबद्दलची आणखी एक विशेषता म्हणजे, अपूर्ण राहिलेली कविता नंतर कधीच पूर्ण होत नाही. ..

मनापासून मनापर्यंतच्या निमित्याने आम्ही साहित्य क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा आमची कुणाशी ओळख नव्हती किंवा पुरेसं भांडवल वा साधनसामग्रीही नव्हती. .. परिस्थिती सद्ध्या फार वेगळी आहे असं म्हणनार नाही पण एक नेहमी बिघडलेलं असणारं संगणक, एंड्राइड मोबाइल, इंटरनेट आणि फक्त मित्रांच्या भरवश्यावर एक त्रैसिका काढण्याचा विचार. ..? खरं तर मी या गोष्टिवरही कधी विचारच केला नाही. ..

मनापासून मनापर्यंत प्रत्यक्ष प्रकाशित होईपर्यंत किती हेलपाटे खावे लागले ते विक्की आणि राहुल तुम्हाला मझ्यापेक्षा चांगल्याने सांगू शकतील. .. १९-२० वर्षे वयाची दोन मुले अभ्यास वगैरे सोडून काहीतरी शुल्लक आणि चिल्लर कामात वेळ वाया घालवत आहेत अश्या समजूतीत कित्येकांनी थट्टा उडवली. .. मनापासून मनापर्यंतच्या नोंदणी करिता धर्मायुक्त कार्यालयात आम्ही गेलो होतो तेव्हा पूर्ण स्टाफ आमच्याकडे बघतच राहिला. .. मग विक्कीने त्यांना पूर्ण संकल्पना उलगडून सांगितली. .. कित्येकांचा एक प्रश्न होता तो म्हणजे "विदाउट प्रॉफिट इन्वेस्टमेंट" कशासाठी? विक्कीकडे याचंही उत्तर होतं. ..

"आपल्या मनातील भावना इतरांच्या मनापर्यंत पोहोचविन्यासाठी. .."

उत्तर थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. .. इतक्याच साठी आम्ही ही सगळी मेहनत घेतली. .. मझ्यासोबतच हे सारे प्रसंग विक्की, राहुल, सुनिल ही कधीच विसरणार नाहीत. ..

शिर्षक ठरविण्यापासून तर अंकाच्या अंतरंगाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मी ज्ञानेश्वर दा, मोहन खेरडे सर आणि सुनिल दा चे किती आभार मानावे ते शब्दांत सांगता येण्यासारखं नाही. .. सुनिलदा च्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गदर्शनाबद्दल आता काय लिहू. .. अंकनिर्मितीच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंकनिर्मितीपर्यंत पावलोपावली सुनिल दांचा मदतीचा हात आमच्या पाठीशी होता. .. आमच्या पहिल्या अंकाला पहिली प्रतिक्रिया मिळाली ती सुनिल दाची. .. तशीच दुसऱ्या अंकासाठीही पहिली प्रतिक्रिया सुनिलदाचीच होती. .. आमच्यासाठी या दोनही प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आणि प्रोत्साहनपर होत्या. .. सुनिलदा मनापासून सांगतो , आपल्या मार्गदर्शनाचा हात पाठीशी असेपर्यंत आता आम्ही थांबणार नाही. ..

मनापासून मनापर्यंत मुळे नवे मित्र मिळाले. .. अनेक लोकांशी ओळखी झाल्यात. .. नवीन गोष्टी माहिती पडल्यात. .. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे आत्मविश्वासात झालेली वाढ. .. गेल्या वर्षी मी संगणकशास्त्र शाखेतून कल्चरल टीम साठी नाव दिलं तेव्हा पहिल्या अंकातील माझीच नेतृत्वचूक-२ ही कविता वाचून दाखविली होती. .. बहुधा सर्वांना ती आवडली असावी असा मीच स्वतःचा समज करून घेतला पण इतक्या लोकांसमोर प्रत्यक्ष कविता वाचून दाखविल्यानंतरचा आनंद शब्दांत व्यक्त करता येण्यासारखा नाही. .. नंतर काही लोकांनी कवितेची प्रशंसा केली आणि हा आनंद द्विगुणित झाला. .. आशा करतो ही फक्त सुरुवात असावी. ..

काही कारणांमुळे बाबासाहेबांवरचा अंक आम्ही प्रकाशित करू शकलो नाही. .. पण या अंकामागच्या संकल्पनेबाबत थोडंसं बोलावसं वाटलं म्हणून सांगतो. .. पुस्तकांसाठी राजगृह बांधणाऱ्या तर समता,मूकनायक आणि बहिष्कृत भारत अश्या नियतकालिकांद्वारे अस्पृश्य समाजाला वाचा फोडणारी तेजस्वी पत्रकारिता करणाऱ्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिवस म्हणजे ६ डिसेंबर. .. त्या निमित्याने आम्ही बाबासाहेब विशेषांक ६ डिसेम्बर रोजीच प्रकाशित करायचं ठरवलं होतं. .. बाबांचं ग्रंथप्रेम जगावेगळं होतं आणि ते जगविख्यात आहे. .. साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातही बाबांचं एक वेगळं स्थान आहे. .. असं असूनही एक साहित्यिक किंवा पत्रकार म्हणून इतिहासाने बाबांवर दुर्लक्ष्यच केलं आहे. ..
साध्या विकिपीडिया वर सर्च केलं तर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय कायदेतज्ञ व राजकारणी होते, इतकंच. .. साहित्याचं काय? बुद्ध आणि त्यांचा धम्म, रानडे गांधी आणि जीना, शुद्र पूर्वी कोण होते अशी कितीतरी पुस्तके बाबासाहेबांनी लिहिलीत. ..
बाबांच्या विचारांतून आम्हाला लिहिन्याची प्रेरणा मिळाली. .. त्यामुळे हा अंक निश्चितच आमच्या हृद्याच्या अगदी जवळ असणार होता. .. तिसऱ्या अंकाची रुपरेषा बनवणं चालू असताना बाबांवर बरेच लिहितील आपण त्यांच्या विचारांवर लिहू, सद्द्य परिस्थितीवर लिहू किंवा एका वेगळ्या अस्तित्वावर लिहू असं विक्कीने मत ठेवलं होतं आणि त्यालाच मध्यवर्ती ठेवून आम्ही त्या अंकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. ..
६ डिसेम्बर निमित्त अनेक साहित्यिक लिहितील, अनेक नेतेही बोलतील. .. पण बाबांच्या विचारांना प्रत्यक्ष किती अंमलात आणल्या जातं. ..? विक्किचं आंबेडकरी चलन हरवलंय तर दलित नेतृत्त्व अतिशय दुबळं पडलंय हे भीषण वास्तव आहे. .. दलित जनतेची अवस्था तर कळतंय पण वळत नाही सारखीच झालेली आहे. .. बाबांची शिका ही शिकवण तर घराघरापर्यंत पोहोचते आहे पण संघटन आणि संघर्षाचं काय? हि एक दूसरी संकल्पना आमच्या डोक्यात होती. ..
"वर्ल्ड बेस्ट लिटरेचर ऑफ दि मंथ" या नियतकालिका मध्ये बाबांच्या प्रबंधाचा निवडक भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. ..
बाबांनी साहित्याच्या विविध शाखेचा अभ्यास केला. .. ते ग्रंथालयात सर्वात आधी हजर असत आणि सर्वांत शेवटी बाहर पडत. .. पार्शियन, इंग्रजी, संस्कृत, जर्मन, मराठी, गुजराती अश्या कितीतरी भाषांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. .. संस्कृत वाङमयापुढे पार्शियन वाङमय अगदी फिके आहे असं बाबा म्हणत. .. संस्कृत भाषा चांगल्या रीतीने अवगत करण्याची त्यांची मनापासून तळमळ होती. .. कधीकधी जेवनाचीही पर्वा न करता बाबासाहेब लिहित वाचीत बसत. .. "मला चार मुले झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो!" व राजकारणानंतरचे आवडीचे काम म्हणून "i would do literary work" असं ते म्हणाले होते. .. इंग्रजीत त्यांनी बरंच साहित्य लिहिलं. .. आपल्या सप्ताहिकांमधून त्यांनी मराठी लेखन केलं. .. "खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर प्रेम आहे" असं बाबा म्हणत. .. फक्त दिल्लीच्या निवासस्थानीच त्यांचा २० हजारांपेक्षा जास्त निवडक पुस्तकांचा संग्रह होता. ..
आपल्या समाजात उत्तम लेखक निर्माण झाले पाहिजेत असा ते उपदेश करत. .. त्यांच्या वृत्तपत्रांचे ध्येयधोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली छापल्या जात असे. .. मूकनायक साठी तुकाराम तर बहिष्कृत भारत साठी ज्ञानदेवांच्या ओव्या वापरल्या. .. यावरून त्यांचा संत साहित्याचा खोलवर केलेला अभ्यास दिसून येतो. ..
  बाबांच्या लेखनाचा पत्रकारितेच्या दृष्टीने अजूनही हवा तसा अभ्यास झाला नाही. ..
  बाबांच्या साहित्यक्षेत्रातल्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांवरचा विशेष अंक प्रकाशित होवू शकला नाही याचं दुःख वाटत राहील पण लवकर च आम्ही तो अंक प्रकाशित करण्याचा पुनः प्रयत्न करू. ..

काही कारणात्सव तात्पुरतं मनापासून मनापर्यंतला अनियतकालिकेच्या रुपात प्रकाशित करत आहोत पण लवकरच आम्ही मनापासून मनापर्यंतच्या चौथ्या अंकासोबत परत आपल्या भेटिला येवू. ..

© विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment