Popular Posts

Saturday, 4 July 2015

असंच. .. सहजच. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ असंच. .. सहजच. .. ”

 
ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

आयुष्य... मोजायचं ठरवलं तर जन्मानंतर आणि मृत्युआधीचा अश्या दोन श्वासातलं अंतर आहे केवळ... पण किती हा गुंता... सुटता सुटेना... आयुष्याच्या या गुंत्यात मध्यभागी आहे तो भावनेचा धागा, या एकाच धाग्याने बाकी सर्व धागे इतके काही करकचुन बांधलेत की सोडायचं म्हंटलं तर सुरुवात कुठे नि कुठे शेवट याचा अंदाजही येणार नाही...

सृष्टीच्या नियमानुसार एक नवीन दिवस येतो अन् जातो... पण प्रत्येक दिवस नवीन काहीतरी उलथापालथ करून जातो... ही उलथापालथ कधी चांगली कधी वाईट... इंद्रधनुष्याचे विविध रंग, छटा ह्या सुंदर वाटतात... पण मानवी मनाला लाभलेल्या भावनिक छटांना उमजुनच घेता येत नाही... एकच व्यक्ती... एकच मन... पण क्षणाक्षणाला मनातली भावना मात्र वेगवेगळी... कधी काळजी, कधी भीती, कधी प्रेम, कधी तिरस्कार, आनंद, दुःख, दया, घृणा, आणखी आणि कितीतरी... आणि अश्याही बऱ्याच मनस्थिती आहेत ज्यांचे नामकरणही अद्याप झालेले नाही...

माणुस... सतत कशाततरी अडकत जातो... कुठेतरी... मग ती एखादी व्यक्ती असो वा वस्तु... स्वप्न असो वा निव्वळ आशा... अडकत जाण्याचा क्रम मात्र ठरलेलाच... आधी आकर्षण... मग आवड... मग सवय आणि बघता बघता सवय व्यसनात बदलते... कितीतरी प्रश्न... उत्तर शोधायला बसलो तर, उत्तर तर सापडत नाहीच, मात्र आणखी प्रश्न नक्की निर्माण होतात... देवाचा आधार घ्यावा तर तेही नाही, तिथे संवाद हा केवळ एकतर्फीच... आपण पोटतिडकीनं देवाला काही सांगतो, काही मागतो ; बरं मागणीचं जाउदयात, पण नेमकं करावं काय? याचं उत्तरही देव देत नाही... बरं देव इशाऱ्यातुन बोलतो असं म्हंटलं तर झालेल्या इशाऱ्याचा अर्थही आपण नेहमी आपल्याला हवा तसाच लावत जातो... पण त्यासाठीही, आपल्याला नेमकं हवंय काय, हे कळायला पाहीजे; हाही मोठा प्रश्नच आहे... नेमकं हवंय काय?

तसं तर जगण्यासाठीच्या काही मुलभुत गरजा आहेत, आणि त्या सर्वच पुंर्णत्वास जाऊन त्यापेक्षा अधिक आहे... तरीही, मनाचा कोपरा रिकामा तो रिकामाच... काहीतरी शोधतच असतो... पण काय माहीत नाही...

जे हवं आहे ते मिळेल का? मिळालं तर "हेच हवं होतं" असं वाटेल का? आणि वाटलंच समजा तर मग 'स्वार्थ साधला का मी?' अश्या विचारांत अपराधीपणाच्या भावनेने डोकं वर नाही काढलं तर नवलच... असो... 'आली या भोगासी' ही म्हण बदलुन, आता "आलो या जन्मासी" तर जगुयाच...

:) चैताली


© चैताली आसोलकर

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment