Popular Posts

Tuesday, 24 June 2014

रानपिंगळा

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


रानपिंगळा

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

रानपिंगळा या विषयावर मुद्दामच लिहितोय...... दोन वर्षांआधी रानपिंगळा आणि त्याचा अभ्यास या दोनही विषयांशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता...... नेचर फोटोग्राफी हा वाचना व्यतिरिक्त माझा आवडता छंद.... आमच्या विद्यापीठातर्फे असाच फोटोग्राफी चा छंद असनार्र्या मुलांसाठी मुद्दाम काही पर्यावरण प्रेमी शिक्षकांनी व्यवसायाभिमुख विषय म्हणून इको-टूरिज्म एंड वाइल्डलाइफ फोटोग्राफी हा जोड अभ्यासक्रम मंजूर करवून घेतला होता..... आमच्या महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे डॉ.गजानन वाघ या अभ्यासक्रमाची सर्व जबाबदारी सांभाळत होते..... मी आणि आशिष, आम्हाला या अभ्यासक्रमाबद्दल कळलं आणि आम्ही वाघ सरांची भेट घेतली..... खरं सांगायचं झालं तर संगणकशास्त्राचे विद्यार्थी आणि नेचर रिलेटेड कोर्स? त्यांना धक्का बसला की काय कोण जाने, पण नक्की कोर्स करायचाय ना? असं दोन तीन वेळा विचारून झाल्यावरच आम्हाला एडमिशन फॉर्म देण्यात आला.....
वाघ सर अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते..... काही गोष्टी अगदी व्यवस्थित समजाव्यात म्हणून ते वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करत.....

जानेवारी 2013 मध्ये शहरात 26 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते, आणि याचे आयोजक होते "वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था"...... वाघ सर या संस्थेशी रिलेटेड असल्याने आम्हाला वालंटियर म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.....
या संमेलनाचं मुख्य वैशिष्ट होतं, "सातपुढ्याचं वैभव : रानपिंगळा".....
अनेक मान्यवर या पक्ष्याबद्दल बरंच काही बोलले..... पण माझं लक्ष आकर्षित झालं ते मानद वन्यजीव रक्षक व "वाइल्डलाइफ एंड नेचर कंझर्वेशन सोसाइटी" चे सचिव डॉ. जयंत वडतकर यांच्या प्रेजेंटेशन ने..... डॉ.जयंत वडतकर हे बर्र्याच वर्षांपासून या पक्ष्यावर संशोधन करतायेत.....
त्या दिवसानंतर रानपिंगळा हा माझ्या अभ्यासाचा विषय बनला.... या लेखात नोंदविलेली माहिती माझ्या एनवायरनमेंट प्रोजेक्ट साठी तयार केलेल्या संकलनातील काही अंश आहे.....

आज मेळघाटातील सर्वांत महत्त्वाचा व प्रसिद्ध असा पक्षी म्हणजे रानपिंगळा.....
शुभ्र पोट, ठिपकेरहित डोके व पाठ असे रूप असलेल्या रानपिंगळ्याला आदिवासी बोलीत डुडा नावाने संबोधले जाते तर संस्कृतात तो खर्गला आणि मराठीत रानपिंगळा म्हणून ही ओळखला जातो......
 या पक्षाचं शास्त्रीय नाव Athene blewitti (अथेनी ब्लुइटी) आणि इंग्लिश नाव Forest Owlet (फॉरेस्ट औलेट) असं आहे......

येल विद्यापीठ आणि झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांनी जगभरातील सर्व पक्ष्यांचा अभ्यास करून प्रसिद्ध केलेल्या नामशेष होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या शंभर पक्ष्यांच्या यादीत महाराष्ट्रातील सहा पक्ष्यांचा नामनिर्देश करण्यात आलेल असून, पहिल्या दहा पक्ष्यांमध्ये रानपिंगळ्याचा समावेश आहे......
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात बीएनएचएसने रानपिंगळा हा राज्यपक्षी करावा अशी मागणी केली होती.....रानपिंगळा हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि या पक्षाचं संवर्धन व्हावं असा या मागचा उद्देश होता..... पण वन्यजीव सल्लागार मंडळासोबत झालेल्या बैठकीत हरियाल हाच राज्यपक्षी ठेवण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला.....
मेळघाटातील पक्षिवैभव सातत्याने विकसित होत आहे आणि नव्या दुर्मिळ पक्ष्यांची त्यात वाढ होत आहे.... मेळघाट प्रदेशामध्ये पक्ष्यांच्या नोंदी व अभ्यासाचे काम सर्वप्रथम २0व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश अधिकार्‍यांद्वारे केले गेले. त्या वेळी मेळघाटामध्ये त्यांनी २४0 जातींचे पक्षी नोंदविले होते.  आज नव्याने झालेल्या काही पक्ष्यांच्या नोंदीमुळे मेळघाटाची पक्षी सूची २९२ पर्यंत पोहोचली आहे.  १९९७ मध्ये भारतातील नष्ट झालेल्या चार पक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेला रानपिंगळा (Forest Owlet) या पक्ष्याचा नंदूरबार जिल्ह्यातील तळोद्याच्या जंगलात पुनर्शोध लागला आणि भारतातील नामशेष झालेल्या पक्ष्यांपैकी एक पक्षी पुन्हा सापडला.....

पहिल्यांदा इ.स. १८७२ मध्ये त्याचा शोध लागल्यापासूनच तो कायम चर्चेत राहिला. एफ.आर. ब्लेविट या शास्त्रज्ञानं १८७२मध्ये फुलझन (मध्य प्रदेश)मधून या पक्ष्याचे काही गोळा केलेले नमुने अभ्यासून पुढच्या वर्षीच प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ ए.ओ. ह्यू यांनी त्याचं वर्गीकरण केलं आणि हा पक्षी वेगळा असल्याचं संशोधन मांडलं. त्यानंतर त्त्या पक्ष्याचं शास्त्रज्ञाच्या नावानंच म्हणजे ऍथिनी ब्लेविटी असं नामकरण झालं. १८७७ ला या पक्ष्याचा अधिक अभ्यास करण्यात आला. त्यावेळी हा पक्षी सरईपल्ली ते गोमर्धा, उंदती अभयारण्य, रायपूर ते बसना रोड (आताचे) आढळून आला. फेब्रुवारी १८७७ ला व्हॅलेंटाईन बेल या अभ्यासकानं खारियार-संबलपूर (ओरिसा)  नंदूरबार, तळोदा, खान्देश (सातपुडा,महाराष्ट्र) आणि रायपूर (मध्य प्रदेश) याठिकाणाहून या पक्ष्यांचे एकूण ५ नमुने गोळा केलेत. हे सर्व नमुने आजही इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या गेलेत.....

२० व्या शतकाच्या सरत्या काळात अमेरिकन पक्षी शास्त्रज्ञांच्या एका समुहानं मात्र हा पक्षी अजून या पृथ्वीतलावर जिवंत असेल अशी आशा ठेवून त्याला शोधण्याचं आव्हान स्वीकारलं. ब्रिटिश म्युझियममधून १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी गोळा केलेल्या नमुन्याच्या दिसण्यावरून आणि त्यांच्या सापडण्याच्या ठिकाणाच्या नोंदीवरून पामेला रासमुसेन, बेनकिंग आणि डेव्हिड अबॉट यांच्या संशोधन चमूनं आपली मोहीम आखली आणि १९९७ ला भारतात येऊन गुजरातच्या पश्चिमेकडच्या टोकापासून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वत रांगेत शोध मोहिमेस प्रारंभ केला, अन् अगदी लवकरच म्हणजे २७ नोव्हेंबर १९९७ ला या चमूस नंदूरबार जवळच्या तळोद्याच्या जंगलात हा पक्षी पुन्हा सापडला. तब्बल ११३ वर्षानंतर रानपिंगळ्याचा पुनर्शोध लागला ही बातमी जगभर पसरली आणि रानपिंगळा पुन्हा चर्चेत आला. हा पक्षी सातपुड्यामध्ये साधारणत: समुद्रसपाटीपासून ३५० ते १००० मीटर उंचीवर सापडतो. रानपिंगळा हा आकारानं साधारणत: २३ सेंमी म्हणजेच सामान्य ठिपकेवाल्या पिंगळ्याच्या आकाराचा असून रंगानं करडा विटकरी आणि पोटावरची पिसं पांढ-या रंगाची असतात. पंखांवर ठिपकेवाल्या पिंगळ्याप्रमाणचे पांढरे ठिपके असले तरी त्याच्या डोक्यावरील बारीक भूवई आणि मानेखाली बारीकशी पांढरी कॉलर याचं वेगळेपण दर्शविते. याचा आवाज ठिपकेवाल्या पिंगळ्याप्रमाणं कर्कश नसून कोकिळेप्रमाणं कुहू असा गोड आहे. याशिवाय तो आणखी काही वेगळे आवाजसुद्धा काढतो. रानपिंगळ्याचं खाद्य हे सामान्य पिंगळा ह्या छोट्या घुबडाप्रमाणंच उंदीर, सरडे, पाली, कीटक असं असून हा झाडाच्या ढोलीमध्ये घरटे करून राहतो.
आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून सध्या जगभरात फक्त सातपुडा म्हणजेच महाराष्ट्रातल्या हा पक्षी सापडत असून आता त्याची ओळख सातपुडा प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक टू सातपुडा) व संपण्याचा ज्वलंत धोका (Critically Endengered) असणारा पक्षी अशी झाली असून या प्रजातीचे फक्त ५० ते १०० इतकेच पक्षी आज अस्तित्वात असावेत असं मानलं जातं..... त्यामुळेच या पक्ष्याचा समावेश दुर्मिळ पक्ष्याच्या यादीमध्ये वरच्या स्थानी केला गेला आहे....

हा पक्षी आज मेळघाटामध्ये ६0 पेक्षा जास्त संख्येने आढळून आला आहे..... पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे फक्त रात्रीच संचार करीत नाही तर दिवसाही संचार करतो. त्यामुळे तो शिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पकडला व मारला गेला असण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात संकुचित होत चाललेली जगंलं, या पक्ष्याच्या अधिवासामध्ये होणारी वृक्षतोड, शेतीसाठी केलं जाणारं अतिक्रमण, वन तसंच परिसरातल्या शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक औषधं इत्यादीमुळे ही हा पक्षी आणि त्यांचे अधिवास धोकादायक झालेले आहेत....

ठराविक अधिवासातच याचं अस्तित्व असल्यामुळे हे अधिवास जर आज आपण वाचवून ठेवू शकलो नाही तर ११३ वर्षांनंतर पुनर्शोध लागलेला एक महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ पक्षी पुन्हा या पृथ्वीतलावरून लुप्त होण्यास वेळ लागणार नाही......

 © विशाल इंगळे

संदर्भ :
1) http://mr.m.wikipedia.org/wiki/रानपिंगळा
2) http://news1.marathisrushti.com/articles/printarticle.php?article=1101950 (- डॉ. जयंत वडतकर)
3) http://www.saamana.com/2014/April/27/Link/Utsav10.htm (- दा. कृ. सोमण)
4) http://abpmajha.abplive.in/mumbai/2011/06/28/article207443.ece/हरियाल-यापुढेही-राज्यपक्षी (- जयवंत पाटिल)
 5) http://www.ranvata.in/node/547 (- डॉ. जयंत वडतकर)  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका


No comments:

Post a Comment